ज्योती मल्होत्राचे इन्स्टाग्राम खाते बंद   

नवी दिल्ली : हरियाणातील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिचे इन्स्टाग्राम खाते बंद केले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास १ लाख ३३ हजार फॉलोअर्स होते. पाकिस्तानसाठी तिने हेरगिरी केल्याचा तिच्यावर आरोप असल्याने तिच्यावर ही कारवाई केली. 
 
‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे तिचे युट्यूब चॅनेल आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी ती पाकिस्तानला गेली होती. तिची ही ट्रीप स्पॉन्सर्ड करण्यात आली होती, असे ही पोलिसांना चौकशीतून समजले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन 'सिंदूर'दरम्यान ज्योती पाकिस्तानच्या संपर्कात होती. परंतु,भारतीय संरक्षणासंबंधातील कोणतीही गुप्तचर माहिती तिच्याकडे नव्हती. पाकिस्तानी एजंटने पाकिस्तानचे चित्र सकारात्मक बनवण्यासाठी तिचा वापर केला होता.
 
मूळची हरियाणाच्या हिसारची असणारी ज्योती मल्होत्राला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. भारताबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ज्योतीवर असून तिची कसून चौकशी केली जात आहे. ज्योती या पूर्वी  पाकिस्तानलादेखील जाऊन आली असून भारतातील पाकिस्तानी दूतावासातही तिचा चांगला संपर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्योतीनेच गेल्या वर्षी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासाकडून इफ्तार पार्टीचे विशेष आमंत्रण आल्याचे आपल्याच व्हिडीओमध्ये नमूद केले होते. 
 
ज्योती मल्होत्राने या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दूतावासातील तत्कालीन अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याने आपल्याला या पार्टीसाठी विशेष आमंत्रित केल्याचे ही म्हटले आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये दानिशच ज्योतीची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील उच्चपदस्थांशी ओळख करून देत असल्याचे ही दिसत आहे.

दानिशची हकालपट्टी

अवघ्या आठवड्याभरापू्र्वीच भारत सरकारने दानिशची हेरगिरीच्या आरोपावरून भारतातून हकालपट्टी केली होती. दानिश व ज्योती एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते, अशी माहितीही प्राथमिक तपासातून समोर येते.

Related Articles